सेवा संकल्प अभियानाला पनवेलमध्ये प्रारंभ ; महिनाभर विविध सामाजिक उपक्रम

‘सेवा, माझे योगदान’ संकल्पनेतून नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर

By Raigad Times    18-Sep-2026
Total Views |
panvel
 
पनवेल | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑटोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी मैदानावर गुरुवारी या अभियानाचा शुभारंभ महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते झाला.
 
यावेळी महापौर नितीन पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले संपूर्ण जीवन देशसेवेसाठी समर्पित केले आहे. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानानिमित्त हे अभियान राबविण्यात येत असून, विविध सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
 
उद्घाटनप्रसंगी उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, प्रभाग समिती सभापती अजय बहिरा, नगरसेवक गणेश कडू, सुमित झुंजारराव, कुसुम म्हात्रे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अभियानाच्या प्रारंभी महापालिका कर्मचार्‍यांनी भारताच्या नकाशाची भव्य मानवी रांगोळी साकारून देशभक्तीचा संदेश दिला. तसेच महापालिकेच्या उर्दू शाळा आणि दि. बा. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘सत्यमेव जयते’ आणि ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनांवर मानवी रांगोळी साकारली.
 
महापौरांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेवा, माझे योगदान’ या संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आरोग्य तपासणी शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता, मतदार जागृती, महिला आरोग्यविषयक उपक्रम यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
 
पर्यावरण विभागाकडून वृक्षलागवड, घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छता उपक्रम, तर आरोग्य विभागाकडून रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. अभियानाचा समारोप १६ ऑटोबर रोजी ‘सेवा ज्योत यात्रा’ने होणार असून, त्यामध्ये दुचाकी रॅलीचाही समावेश असेल. विविध उपक्रमांत उल्लेखनीय योगदान देणार्‍यांचा सन्मान, बक्षिसांचे वितरण तसेच सेवा प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.
 ‘स्वच्छता ही सेवा-२०२६’अभियानालाही सुरुवात
स्वच्छतेत सहभाग, स्वच्छ भारत,विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित ‘स्वच्छता ही सेवा-२०२६’ अभियानालाही गुरुवारपासून प्रारंभ झाला. १७ सप्टेंबर ते २ ऑटोबरदरम्यान नागरिकांचा सहभाग वाढविणे, स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, स्वच्छता लक्षित युनिटचे परिवर्तन, सफाईमित्रांचा सन्मान, युवक व विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच कचर्‍यापासून संपत्ती निर्मिती यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत