महाड | महाड तालुक्यातील कुर्ला धरणाच्या पायथ्याशी असलेल्या डोहात पोहण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे कोल परिसरात शोककळा पसरली आहे. राहुल दिलीप घाणेकर (वय २२, रा. कोल-विठ्ठलवाडी, ता. महाड) असे मृत तरुणाचे आहे.
राहुल हा गुरुवारी दुपारी मित्रांसोबत कुर्ला धरणाच्या पायथ्याशी असलेल्या डोहात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. राहुल बुडत असल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने साळुंखे रेस्क्यू टीमला पाचारण केले.
टीमचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी डोहात शोधमोहीम सुरू केली. अथक प्रयत्नांनंतर राहुलला पाण्याबाहेर काढण्यात आले. यानंतर तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद महाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.