खोपोली | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी (७ ऑगस्ट) मध्यरात्री भरधाव फॉर्च्युनर कारने मालवाहू पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तुषार भूमकर (रा. वाकड, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चारजण जखमी झाले आहेत.
अपघाताची संपूर्ण घटना बोगद्यातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. तुषार भूमकर हे मित्रांसह फॉर्च्युनर कारने मुंबईकडे जात होते. मिसिंग लिंक बोगद्यात प्रवेश केल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने समोरील मालवाहू पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की फॉर्च्युनरचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर बचावकार्य सुरू असताना बोगद्यातील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळविण्यात आली. महामार्ग पोलीस, आयआरबी, देवदूत पथक आणि इतर आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलविले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, बोगद्यात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने आपत्कालीन संपर्क साधण्यातही अडचणी आल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंक बोगद्यातील सुरक्षा आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अरुण म्हामुणकर यांनी, या मार्गावर केवळ एकच क्रेन उपलब्ध असल्याने मोठ्या अपघातानंतर वाहने हटविण्यास विलंब होऊ शकतो. आमच्याकडे पाच ते सहा क्रेन सज्ज असून, परवानगी मिळाल्यास एका मिनिटात घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करू शकतो, असेही म्हटले आहे.