पाली-खोपोली महामार्गावर मोकाट गुरांचा ठिय्या;रासळ-कानसळमध्ये प्रश्न गंभीर

प्रशासन अपघाताची वाट पाहतंय का? वाहनचालकांना सवाल

By Raigad Times    31-Aug-2026
Total Views |
pali
 
सुधागड-पाली | पाली-खोपोली महामार्गावरील रासळ आणि कानसळ परिसरात मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, या गुरांनी महामार्गावर अक्षरशः ठाण मांडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. रस्त्याच्या मधोमध कळपाने गुरे उभी राहत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.
 
विशेषतः रात्रीच्या वेळी अचानक वाहनांसमोर गुरे आल्याने मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का? असा सवाल संतप्त वाहनचालक, नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पाली-खोपोली हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या महामार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र रासळ-कानसळ परिसरात अनेकदा मोकाट गुरे रस्त्याच्या मध्यभागी बसलेली किंवा फिरताना दिसतात.
 
वाहनांचे हॉर्न वाजवूनही गुरे रस्ता सोडत नसल्याने वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात. काही वेळा वाहनचालकांना खाली उतरून गुरांना रस्त्याच्या कडेला हाकलावे लागते. यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावतो. दिवसा गुरे काही प्रमाणात चालकांच्या लक्षात येतात; मात्र रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक धोकादायक बनते. वाहनांच्या प्रकाशझोतात अचानक गुरांचा कळप समोर आल्यास चालकाला वाहन नियंत्रित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.
 
त्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी तसेच अवजड वाहनांना अपघाताचा धोका वाढला आहे. गुरांना वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन रस्त्याच्या बाहेर जाण्याची किंवा समोरून येणार्‍या वाहनाला धडकण्याची शक्यताही नाकारता येत नाही. काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध गुरांच्या झुंजी सुरू असल्याचेही वाहनचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागण्याची शक्यता असते.
 
महामार्गावर अशा प्रकारे गुरे मोकाट सोडली जात असताना संबंधित पशुमालक मात्र कुठे असतात, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. गुरे पाळण्याची जबाबदारी स्वीकारणार्‍या पशुमालकांनी त्यांना मोकाट सोडू नये, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. गुरांना महामार्गावर मोकाट सोडल्यामुळे अपघात झाल्यास संबंधित पशुमालकाची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
 
रासळ-कानसळ परिसरातील मोकाट गुरांचा तातडीने बंदोबस्त करून संबंधित पशुमालकांची ओळख पटवावी, गुरे महामार्गावर सोडल्यास त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. महामार्ग हा वाहनांच्या सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी आहे; मोकाट गुरांना ठाण मांडण्यासाठी नाही. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.