पनवेल | खारघर येथील प्रसिद्ध पांडवकडा धबधबा परिसरात बुडालेल्या २३ वर्षीय तरुणाला सिडको अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. आदित्य विश्वकर्मा असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे.
गुरुवारी (१३ ऑगस्ट) दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास पांडवकडा धबधबा परिसरात एक व्यक्ती बुडाल्याची माहिती खारघर येथील सिडको अग्निशमन केंद्राला मिळाली. माहिती मिळताच फायर जीपसह अग्निशमन जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मुसळधार पाऊस सुरू होता.
तसेच धबधब्यात वरून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक बनले होते. जवानांनी दोरीच्या सहाय्याने धबधब्याच्या पाण्यात शोधमोहीम सुरू केली. सुरुवातीला तरुणाचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर जवानांनी पाण्यात उतरून परिसरात सखोल शोध घेतला असता, एका दगडाच्या कपारीत सुमारे १० ते १२ फूट खोलीवर आदित्य आढळून आला. जवानांनी मोठ्या शर्थीने त्याला पाण्याबाहेर सुरक्षितपणे काढले.
त्यानंतर स्ट्रेचरच्या सहाय्याने त्याला डोंगराच्या खाली आणण्यात आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बचावकार्यात सिडको अग्निशमन केंद्र, खारघरचे अग्निशमन प्रणेता प्रशांत दरेकर, फायरमन सूरज पाटील, प्रीतम पाटील, चेतन पवार आणि कौस्तुभ वायदंडे यांचा सहभाग होता.