पनवेल | पनवेल विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर शिवसेना ठाकरे गटाच्या पनवेल महानगरपालिकेतील गटनेत्या लीना अर्जुन गरड यांनी सवाल उपस्थित केले आहे.
यात प्रामुख्याने बीएलओ नी घरभेटी न घेतल्याचा मुद्दा उपस्थित केला असून भरलेल्या अर्जांची प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे फेरपडताळणी करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी त्यांनी प्रांत अधिकारी पवन चांडक यांना निवेदन दिले आहे. एसआयआरच्या प्रक्रियेत प्रत्येक मतदाराच्या घरी तीन वेळा भेट देऊन त्यांची माहिती घेण्याच्या सूचना बीएलओंना देण्यात आल्या आहेत.
मात्र, बहुतांश बीएलओंनी मतदारांच्या घरी अथवा संबंधित सोसायट्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केलेली नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या प्रक्रियेदरम्यान काही बीएलओंनी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक अथवा पदाधिकार्यांच्या कार्यालयात बसून मतदारांचे अर्ज भरून घेतल्याचा गंभीर आरोप गरड यांनी केला आहे.
तसेच पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीबाहेर वास्तव्यास असलेल्या काही मतदारांचे अर्जही भाजपचे नगरसेवक व पदाधिकार्यांनी भरून दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मतदार यादीतील नोंद केवळ कागदोपत्री न ठेवता संबंधित मतदार प्रत्यक्ष त्या सोसायटीत, प्रभागात किंवा पनवेल विधानसभा मतदारसंघात राहतो का, याची प्रत्यक्ष पडताळणी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गृहभेटी न घेता प्रक्रिया पूर्ण केल्यास एसआयआरचा मूळ उद्देशच बाधित होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. दरम्यान, या तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली नाही, तर उच्च न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. जिल्हाप्रमुख दीपक निकम, महानगरप्रमुख अॅड.समाधान काशीद, गटनेत्या लीना गरड, विभागप्रमुख रामदास गोवारी आणि प्रवीण जाधव यांनी संयुक्तरीत्या याबाबत हरकत नोंदवत निवेदन सादर केले होते.