माणगाव | अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी तरुण अटकेत , हत्येचे कारण अस्पष्ट, तपास सुरु

By Raigad Times    29-May-2026
Total Views |
mangoa
 
माणगाव | माणगाव तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला असताना माणगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि विविध पथकांच्या मदतीने पोलिसांनी या तरुणापर्यंत पोहोचत तपासाला वेग दिला आहे.
 
पळसगाव ग्रामपंचायत हद्दीतील घरोशीवाडी येथे ही धक्कादायक घटना घडली. निधी उतेकर (वय १५) ही मुलगी उन्हाळी सुट्टीसाठी कुटुंबासह गावी आली होती. सोमवारी, २५ मे रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ती वडिलांच्या मोबाईलवर बोलत घराबाहेर पडली होती. मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला होता. दरम्यान, बुधवारी (२७ मे) घरोशीवाडी परिसरातील जंगलात निधीचा मृतदेह आढळून आला.
 
निर्जन भागात मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तिच्या शरीरावरील जखमा पाहता हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. पुरावे संकलित करत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
 
या गंभीर घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपअधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन, तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी घरोशीवाडी येथीलच शुभम उतेकर (वय ३२) याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीअंती गुरुवारी, २८ मे रोजी सकाळी सुमारे ७ वाजता त्याला अटक करण्यात आली."हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, त्यामागील हेतू काय होता, याचा सखोल तपास सुरू असून विविध अंगांनी चौकशी केली जात आहे,” अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी दिली.