म्हसळा | म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शिवसेना शिंदे गटाने अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील शेडगे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर राष्ट्रवादीने जल्लोष केला. मात्र आठ दिवसांपूर्वी फटाके फोडणार्या शिवसेनेच्या गोटात सन्नाटा पसरल्याचे चित्र आहे.
म्हसळा नगराध्यक्षपदावरुन मोठी उलथापालथ पहायला मिळाली. सुरुवातीला राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करणार्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकली. यानंतर शिवसेनेचे शाहिद जंजिरकर नगराध्यक्ष झाले. मात्र राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी वरिष्ठ पातळीवरुन सूत्रे हलवली. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत जंजिरकर यांना नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
शाहिद जंजिरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी पुन्हा निवडणूक जाहीर झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील शेडगे यांचा एकमेव अर्ज दाखल होता. मात्र अंतिम क्षणी शिवसेना (शिंदे गट) शहराध्यक्ष सुफियान हळदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन या निवडणुकीतील सस्पेंन्स वाढवला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा बुधवारी (२७ मे) शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी सुफियान हळदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेडगे हे म्हसळा नगराध्यपदी बिनविरोध निवडून आले आहेत. म्हसळा नगरपंचायतीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही, असा निर्धार शिवसेना नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी केला होता. मात्र मंत्री भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना माघार घेण्यास सांगितले आणि राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा झाला.
सुनील शेडगे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा १ जून २०२६ रोजी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडून करण्यात येईल. दरम्यान, खा.सुनील तटकरे हेच रायगडचे धुरंदर नेते असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे तटकरेंना अंगावर घेऊन शिवसेना शिंदे गटात दाखल झालेल्या नगरसेवकांची या सर्वात चांगलीच नाचक्की झाली आहे. त्यामुळे ना. भरत गोगावले यांच्या भूमिकेबाबतही शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.