माणगाव | रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेमुळे माणगाव तालुक्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव तालुक्यातील पळसगाव ग्रामपंचायत हद्दीतील घरोशीवाडी येथे उतेकर कुटुंबीय उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी आले होते. निधी राकेश उतेकर (वय १५) ही सोमवार, दि. २५ मे रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वडिलांच्या मोबाईलवर बोलत घराबाहेर पडली होती. मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी रात्रीपासून तिचा शोध सुरू केला होता.
दरम्यान, बुधवार दि. २७ मे रोजी घरोशीवाडी परिसरातील जंगलात एका मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार निधीच्या वडिलांना घटनास्थळी बोलावण्यात आले असता मृतदेह हा निधीचाच असल्याचे स्पष्ट झाले आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. निधी उतेकर ही आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील विलेपार्ले येथे राहत होती. ती नुकतीच इयत्ता नववी उत्तीर्ण झाली होती.
उन्हाळी सुट्टीनिमित्त ती आई-वडील व भावासह आठ दिवसांपूर्वी गावी आली होती. ती विलेपार्ले येथील सेंट जेव्हियर्स शाळेत शिक्षण घेत होती. जंगलातील निर्जन भागात निधीचा मृतदेह आढळून आला. तिच्या अंगावर जखमांचे गंभीर निशाण असल्याने हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकही तपासासाठी दाखल झाले असून परिसराची कसून पाहणी करण्यात आली.
मृतदेह माणगाव उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस सखोल तपास करत असून आरोपींचा शोध सुरु आहे. अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येमुळे माणगावात खळबळ उडाली असून नागरिकांकडून खुनीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.