अलिबाग चिखली येथील विवाहितेची आत्महत्या!पती,सासूविरोधात गुन्हा दाखल

By Raigad Times    28-May-2026
Total Views |
alibag
 
अलिबाग | पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली येथे विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी तिच्या पती व सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आले आहे. छळाला कंटाळून विवाहितेने रॉकेल ओतून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा अमर पाटील या महिलेचे यापूर्वी एक लग्न झाले होते आणि तिला सहा वर्षांची मुलगी आहे. त्यानंतर त्यांचा विवाह आरोपी क्रमांक १ याच्यासोबत झाला होता. आरोपी क्रमांक २ ही तिची सासू आहे. पती व सासू यांनी स्नेहा पाटील यांचा सातत्याने मानसिक, शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे.
 
या त्रासाला कंटाळून स्नेहा पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत आग लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर भाजल्याने त्यांना उपचारासाठी मुंबई येथील के. ई.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष सोनावळे करीत आहेत.