१५ व्या वित्त आयोगांतर्गत , ५२ कोटी ७२ लाखांचा निधी रायगड जिल्हा परिषदेकडे वर्ग

जिल्ह्यातील स्वच्छता,पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा विकासकामांना गती मिळणार

By Raigad Times    19-May-2026
Total Views |
alibag
 
अलिबाग | रायगड जिल्हा परिषदेची विशेष सभा सोमवारी (१८ मे) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत १५व्या वित्त आयोगांतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना वाटप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अंतिम आराखड्यास उपस्थित सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापतींच्या अनुमतीनंतर मंजुरी देण्यात आली.
 
ग्रामविकास विभागाकडून २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या चार वर्षांसाठी १५ व्या वित्त आयोगाचा एकूण ५२ कोटी ७२ लाख ८० हजार ९९० रुपये निधी रायगड जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने प्राप्त बंधित व अबंधित अनुदानातून करावयाच्या कामांचा सविस्तर आराखडा तयार केला होता. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील आणि अर्थ सभापती चंद्रकांत कळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या आराखड्यात निधीचे वितरण ठरविण्यात आले आहे.
 
त्यानुसार ३० टक्के निधी स्वच्छता, ३० टक्के निधी पाणीपुरवठा आणि उर्वरित ४० टक्के निधी इतर मूलभूत विकासकामांसाठी वापरण्यात येणार आहे. या आराखड्याला सभागृहातील सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापतींची मान्यता मिळाल्यानंतर अंतिम मंजुरी देण्यात आली. यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधा विकासकामांना गती मिळणार आहे.
 
या सभेसाठी उपाध्यक्ष मधुकर पाटील, अर्थ सभापती चंद्रकांत कळंबे, महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जालिंदर पठारे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी राहुल कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपुरे, जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी, गीता जाधव, दिलीप भोईर, विकास गोगावले, गटनेते संतोष बैलमारे, प्रतोद अमित नाईक, सचिन राऊळ, अदिती दळवी, अनंत गोंधळी, अ‍ॅड.अविनाश ठाकूर, अनन्या गाताडे, निकिता खारकर यांच्यासह इतर सदस्य, पंचायत समिती सभापती, विविध विभागांचे प्रमुख, पत्रकार उपस्थित होते.
 
१५व्या वित्त आयोगाचा ५२ कोटी ७२ लाख ८० हजार निधी आला असून यातून विविध कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये स्वच्छता व पाणीपुरवठा याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतर कामेही वेगाने होती. - मंगेश वाकडीकर, अध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद
१५व्या वित्त आयोगाचा ४ वर्षांचा निधी एकत्रितपणे आता देण्यात आला आहे. या निधीअंतर्गत विविध कामे करण्याचा आराखडा आम्ही तयार केला असून सभागृहाने त्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता विकास कामांना गती येणार असून सर्वांना समान्य न्यायाने निधीचे वितरण करण्यात येणार आहे. - चंद्रकांत कळंबे, अर्थ सभापती, राजिप