पाली-खोपोली राज्य महामार्गावर टेम्पो-कारची धडक; १ ठार, २ गंभीर जखमी

By Raigad Times    19-May-2026
Total Views |
pali
 
बेणसे | पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पेडली गावाच्या हद्दीत सोमवारी (१८ मे) पहाटे भीषण रस्ता अपघात होऊन एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. कार आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या जोरदार धडकेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
 
कारमधील प्रवासी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून मुंबईच्या दिशेने जात होते. सोमवारी पहाटे सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास कार पेडली परिसरात आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणार्‍या आयशर टेम्पोला कारने जोरदार धडक दिली. या अपघातात रोहन साळुंखे (रा.खेड, जि.रत्नागिरी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश हजारे (रा. शहापूर, जि.ठाणे) आणि अविनाश पडवळ (रा. टिटवाळा) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
 
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक मदत यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. धडक इतकी भीषण होती की, जखमी कारमध्येच अडकून पडले होते. बचाव पथकाने कटरच्या सहाय्याने कारचे दरवाजे तोडून जखमींना बाहेर काढले. जखमींना तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत रोहन साळुंखे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.