अलिबाग | महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून एकूण १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सर्व जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील असून मतदान १८ जून रोजी होणार आहे. अर्ज भरण्याची मुदत २५ मे ते १ जून अशी निश्चित करण्यात आली आहे.
अर्जांची छाननी २ जून रोजी होणार असून मतमोजणी २२ जून रोजी केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही काळ लांबल्यामुळे या मतदारसंघांतून होणार्या विधानपरिषदेच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या गेल्या होत्या. मात्र, अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्याने या १६ जागांसाठीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
निवडणूक जाहीर झालेल्या मतदारसंघांमध्ये रायगड- रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिवलातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर- जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांकडून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. रायगड- रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाच्या दृष्टीने शिवसेना (शिंदे गट) आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
भाजप दुसर्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस तिसर्या क्रमांकावर असल्याचे मानले जात आहे. सर्वाधिक मतदार शिवसेनेचे असल्याने ही जागा सेनेलाच मिळावी, असा कोकणातील सेना नेत्यांचा आग्रह आहे. कोकणच्या जागेआडून इतर राजकीय सौदेबाजी होण्याचीदेखील शक्यता आहे. त्यामुळे या जागेसाठी पालकमंत्रीपद पणाला लावले जात काय? हादेखील राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना पुन्हा या मतदारसंघातून संधी मिळणार का, याकडेही लक्ष लागले आहे. अनिकेत तटकरे यापूर्वी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले होते. मात्र त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर या मतदारसंघाची निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळू शकली नव्हती.
आता निवडणूक जाहीर झाल्याने त्यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद काही प्रमाणात कमी झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये अलीकडच्या काळात जवळीक वाढल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत विधानपरिषदेची ही जागा अनिकेत तटकरे यांना देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर दुसरीकडे पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना मिळावे, यासाठीही प्रयत्न होऊ शकतात, अशी राजकीय चर्चा रंगू लागली आहे. या सर्व घडामोडींमध्ये भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्यावर अनिकेत तटकरे विधानपरिषदेत निवडून आले होते. त्यामुळे यावेळीही त्यांना भाजपचा पाठिंबा मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.