रोह्याच्या कुंडलिका नदीत आढळला मृतदेह

By Raigad Times    19-May-2026
Total Views |
 roha
 
धाटाव | रोहा शहराला लागून वाहणार्‍या बारमाही कुंडलिका नदीत सोमवारी (१८ मे) दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरतीच्या पाण्यात नदीत एक मृतदेह तरंगत असल्याचे पुलावरुन जाणार्‍या नागरिकांच्या निदर्शनास आले.
 
ही घटना काही क्षणांतच परिसरात वार्‍यासारखी पसरली. नागरिकांनी तात्काळ याची माहिती रोहा पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच रोहा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने नदीत तरंगत असलेला मृतदेह बाहेर काढला. प्राथमिक माहितीनुसार, मृत इसम अंदाजे ४५ ते ४६ वर्षे वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
 
सदर मृतदेह नदीत कसा आला? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मृत इसमाची ओळख पटलेली नसून, कोणाला या इसमाची ओळख असल्यास रोहा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पुढील तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुनील शिरसाट, मेजर शरद कोटकर, याकुब तडवी यांच्यासह सहकारी करत आहेत.