उरण | न्हावा शेवा बंदर परिसरात कंटेनरमधील माल चोरीचे रॅकेट पुन्हा एकदा उघडकीस आले असून बेंगलोरहून एक्स्पोर्टसाठी आणलेल्या कंटेनरमधून तब्बल १३ लाख ५६ हजार ५७७ रुपयांचे १,१७० लेडीज ड्रेस लंपास झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे कंटेनर बंद अवस्थेत यार्डमध्ये दाखल झाला होता.
मात्र तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात माल गायब असल्याचे लक्षात आल्याने लॉजिस्टिक साखळीतील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात कंटेनर चालक आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक घटनेनंतर फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाही एक्स्पोर्ट प्रा. लि. या कंपनीतील तयार लेडीज ड्रेस अमेरिकेतील गोलमार्ट कंपनीसाठी निर्यात करण्यात येत होते.
५४८ कार्टून बॉक्समध्ये पॅक केलेला हा माल बेंगलोर येथील पिनिया फॅक्टरीतून न्हावा शेवा बंदरात आणण्याची जबाबदारी ओम लॉजिस्टिक सप्लाय चेन कंपनीकडे देण्यात आली होती. यासाठी पूजा ट्रान्सपोर्टकडून २० फुटी बंद कंटेनर ट्रेलर भाड्याने घेण्यात आला होता. ११ मे रोजी चालक केंम्पाहीय्या जी. हा कंटेनर घेऊन न्हावा शेवा दिशेने रवाना झाला. १३ मे रोजी कंटेनर उरणमधील सोनारी गावातील स्पीडी सीएफएस यार्डमध्ये दाखल झाला.
मात्र तपासणीदरम्यान काही कार्टूनचे वजन कमी असल्याचे आढळले. सर्व बॉक्स उघडून पाहणी केली असता १९७ कार्टूनमधून १,१७० लेडीज ड्रेस गायब असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर चालकाचा मोबाईल बंद लागत असल्याने संशय अधिक बळावला. चौकशीत चालक कंटेनर यार्डमध्येच सोडून पसार झाल्याचे समोर आले. कंपनीने कंटेनरमधील जीपीएस तपासले असता, १३ मे रोजी कंटेनर उरणच्या द्रोणागिरी परिसरातील भैरीदेवी मंदिराजवळील भेंडखळ रोडवर काही वेळ थांबला असल्याचे निष्पन्न झाले. याच ठिकाणी माल चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेमुळे न्हावा शेवा बंदर परिसरात सुरू असलेल्या कंटेनर माल चोरीच्या घटनांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सील असतानाही मोठ्या प्रमाणात माल गायब होणे, मार्गातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह आणि मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. फिर्यादी सचिन सत्यनारायण शर्मा यांच्या तक्रारीवरून न्हावा शेवा पोलिसांनी चालक केंम्पाहीय्या जी. आणि त्याच्या साथीदारांविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश जयकर पाटील करत आहेत.