म्हसळा | दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात रविवारी (१७ मे) दुपारी डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टँकरमधून मोठ्या प्रमाणात डिझेलची गळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, माणगावकडून म्हसळ्याकडे डिझेल घेऊन जाणारा टँकर (क्र. एमएच ०४ एलई ८१३१) घोणसे घाटातील तीव्र उताराच्या धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने संरक्षण कठड्यावर जोरात आदळला आणि पलटी झाला. हा अपघात रविवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडला.
अपघातानंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणात डिझेलची गळती सुरू झाल्याने संभाव्य आग किंवा अन्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून घाटमार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, अपघातग्रस्त ठिकाणी उभारण्यात आलेल्या मजबूत संरक्षण भिंतीमुळे मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.
अन्यथा टँकर खोल दरीत कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घोणसे घाटात वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेकदा आंदोलन करत घाटातील धोकादायक वळणांमध्ये सुधारणा करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. घाटातील शेवटचे उताराचे वळण रस्ता विकासकाने चुकीच्या पद्धतीने तयार केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून, गेल्या पाच वर्षांपासून या मार्गाच्या दुरुस्तीची मागणी प्रलंबित असल्याचेही सांगण्यात येत आहे.