वावोशी | खोपोली शहरातील बाजारपेठ परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका जुगारावर पोलिसांनी धडक कारवाई करत एकाला रंगेहात पकडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. २ एप्रिल रोजी खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी बाजारपेठ परिसरात छापा टाकला.
या कारवाईदरम्यान आरोपी हा स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन ‘कल्याण मटका’ चालवत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ३ हजार ४५ रुपयांची रोख रक्कम, मटका जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक फौजदार संदीप पाटील, पोलीस हवालदार प्रतीक सावंत, रवी मुंडे, रणजितसिंह खराडे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप खरात यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.