आपत्ती व्यवस्थापनाला तंत्रज्ञानाची साथ ; रायगडात आपत्तीपूर्व सूचना थेट गावात!

स्मार्ट आपत्ती सूचना होतेय कार्यान्वित अतिवृष्टीत जीव वाचवणार उद्घोषणा यंत्रणा

By Raigad Times    04-Apr-2026
Total Views |
ALIBAG
 
अलिबाग | रायगड जिल्ह्यातील दरड व पूरप्रवण गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी अत्याधुनिक उद्घोषणा प्रणाली बसविण्यात येत आहे.
 
जिल्ह्यातील सुमारे १५० संभाव्य दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित केली जात असून, या प्रणालीमुळे अतिवृष्टीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयातून थेट १५० पेक्षा जास्त धोकादायक गावांमध्ये संपर्क साधून तात्काळ सूचना व इशारे देणे शक्य होणार आहे.आपत्ती व्यवस्थापन बळकटीकरण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या या उपक्रमात आतापर्यंत जिल्ह्यातील ८० गावांमध्ये यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित ७० गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे.
 
सार्वजनिक ठिकाणी व नाक्यांवर बसविण्यात येणार्‍या या यंत्रणेचा प्रति युनिट खर्च सुमारे ५० हजार रुपये आहे. कोकणातील अतिवृष्टी, पूर, भूस्खलन व चक्रीवादळ यांसारख्या आपत्तींचा धोका लक्षात घेता, तात्काळ माहिती गावपातळीवर पोहोचवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी नाक्यांवर ही यंत्रणा बसविण्यात येत आहे. याआधी हवामान विभागाच्या सूचनांचे जिल्हा ते तालुका आणि तालुका ते गाव पातळीवर संप्रेषण होत असताना विलंब होत होता.
 
ALIBAG
 
मात्र नव्या प्रणालीमुळे हा विलंब टाळून थेट गावांमध्ये उद्घोषणा करता येणार आहे. महाड, पोलादपूर तालुक्यातील वर्ग १ व २ दरडग्रस्त गावांमध्ये तसेच महाड, रोहा, नागोठणे व खोपोली या पूरग्रस्त शहरांमध्येही ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेवर इशारे देऊन जीवितहानी टाळण्यास मदत होणार असून शासनाच्या विविध योजनांची माहितीही प्रभावीपणे पोहोचवता येणार आहे.
आपत्तीकाळात संपर्क यंत्रणा कार्यरत ठेवणे अतिशय महत्वाचे असते, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन उद्घोषणा प्रणाली विकसित केली आहे. ज्यामूळे सूचना आणि इशार्‍यांची थेट उद्घोषणा गावागावात करणे शक्य होणार आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच अशी यंत्रणा आपण कार्यान्वित करत आहोत. - सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रायगड