सुकेळी खिंडीत बसला अपघात; दोघांचा मृत्यू ,२२ जखमी

By Raigad Times    04-Apr-2026
Total Views |
 nagothane
 
नागोठण | मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड, खैरवाडी गावासमोरील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने खासगी बस पलटी होऊन दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे २२ प्रवासी जखमी झाले.
 
हा अपघात शुक्रवारी (३ एप्रिल) पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडला. नागोठणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक खासगी बस पनवेलहून महाडकडे जात होती. चालक हेमंतकुमार बाजीराव पाटील (वय ३६, रा.कणकवली) हा अतिवेगाने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवत असताना सुकेळी खिंडीतील खैरवाडी येथील तीव्र वळणावरील चढावर बसवरील ताबा सुटला आणि बस पलटी झाली.
 
या अपघातात नाईम निजाम शेख (वय ३३) आणि पनवेल येथील ओम सव्हिसेसेच्या मालक वैभव यांच्या पत्नी, वकिल निलम विभुते याचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर २२ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी, पोलीस कर्मचारी तसेच ऐनघर वाहतूक पोलिस केंद्रातील कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
 
जखमींना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती; मात्र पोलिसांनी तत्परतेने वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार राजेश मारकंडे करीत आहेत.