श्रीवर्धन येथील महिलाचा प्रसुतीनंतर मृत्यू , जिल्हा सरकारी रुग्णालयातील घटना

दुर्गावले कुटुंबावर दुःखाचा डोंगर; कुटुंबीयांचा टाहो

By Raigad Times    14-Mar-2026
Total Views |
shreewardhan
 
अलिबाग | बाळाच्या जन्मानंतर काही तासांतच मातेचा मृत्यू झाल्याची दुर्दैर्वी घटना अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. विवा दुर्गवले असे या मातेचे नाव असून ती मूळची श्रीवर्धन येथील राहणारी होती. नवजात बाळ सुखरुप आहे. मात्र एका माऊलीचा करुण अंत झाल्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतेय. विश्वनाथ दुर्गावले आणि विवा दुर्गवले (वय ३२) मूळचे श्रीवर्धनचे असलेले हे दाम्पत्य कामानिमित्त अलिबागजवळील कुरुळ येथे राहत होते. विवा दुर्गवले या गरोदर असल्याने त्यांना ९ मार्च रोजी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १२ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास विवा दुर्गवले यांची प्रसूती होऊन त्यांनी २.५५ किलो वजनाच्या गोंडस बाळाला जन्म दिला.
 
प्रसूतीनंतर विवादेखील सुखरुप असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र संध्याकाळी सात साडेसात वाजण्याच्या सुमारास विवाची तब्येत खालावल्याची माहिती देण्यात आली. विवा दुर्गावले यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. परिस्थिती गंभीर होत असल्याने वैद्यकीय कर्मचार्‍यांनी नवजात अर्भकाला स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये दाखल केले, तर विवा दुर्गावले यांना पुढील उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलवण्यात आले.
 
डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विवा दुर्गावले यांचा मृत्यू झाला. ३२ वर्षीय विवा आता कुठे आई झाली होती. तीची प्रकृतीदेखील बरी होती. मात्र सहासात तासांत असं काय झालं की विवा मृत्यू झाला. तिच्या घरच्यांनाही विश्वास बसत नव्हता. करायचे काय सुचत नव्हते. बाळाचे आगमन आणि मातेचे निधन अशा विचित्र कात्रीत दुर्गवले कुटुंबीय सापडले होते. मात्र विवाचे असे अचानक जाण्याने नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.