अलिबाग | भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा दिवस सुराज्याचा "पांढरा दिवस” असून जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची निवडणूकपूर्व युती होती आणि जनतेने आम्हाला निवडून दिले.
मात्र महायुतीच्या निर्णयामुळे शिवसेनाही सत्तेत सहभागी झाली असेही तटकरे यांनी म्हटले आहे. रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेनंतर शिवसेनेला अपेक्षित सत्तावाटप न मिळाल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र आहे. सत्ता स्थापनेला काहींनी ‘काळा दिवस’ म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी तटकरे यांना छेडले. हा काळा दिवस नेमका कोणासाठी आहे हे मला माहिती नसल्याचे सांगत याबाबत अनभिज्ञता दाखवली.
लोकशाही व्यवस्थेत पदाधिकारी आणि प्रशासन ही दोन्ही चाके महत्त्वाची आहेत. पदाधिकारी नसतील तर प्रशासन आपापल्या पद्धतीने काम करु लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार संसदीय लोकशाही पद्धतीत जनतेला कोण सत्तेत यावे, हे ठरवण्याचा अधिकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेकदा पक्ष वेगवेगळे लढतात. त्यानंतर व्यापक विचार करून एकत्र येण्याचे निर्णय घेतले जातात. जिल्ह्याच्या हितासाठी निर्णय घेण्याचा अधिकार पदाधिकार्यांना असतो, असेही त्यांनी नमूद केले.
निवडणुकीनंतर शिवसेनेच्या काही नेत्यांनी संपर्क साधला होता का, या प्रश्नावर बोलताना तटकरे म्हणाले की, माझ्याशी कोणताही औपचारिकसंपर्क झाला नाही. प्रत्येक पक्षाला आपले धोरण ठरवण्याचा अधिकार आहे. राजकारणात बदलत्या परिस्थितीनुसार अनेक घडामोडी होत असतात.
माझ्या ४० वर्षांच्या राजकीय प्रवासात अनेकदा पक्षांमध्ये संघर्ष आणि संवाद दोन्ही झाले आहेत. राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर मतभेद असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगळे निर्णय घेतले जातात, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत १२ जिल्हा परिषदांमध्ये समन्वयाने काम करण्याचा निर्णय झाला होता. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीनंतर विशेष समित्यांच्या निवडणुकीवेळी सत्तावाटपाबाबत पुढील चर्चा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.