सूरज सारंगे मृत्यू प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल ,अ‍ॅड.महेश मोहिते यांनी केली होती मागणी

By Raigad Times    14-Mar-2026
Total Views |
 murud
 
मुरूड | मुरूड-अलिबाग मार्गावरील सर्वे गावाजवळ मोरीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी पडून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. महेश मोहिते यांनी मागणी केल्यानंतर संबंधित ठेकेदाराविरुद्ध मुरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
ही घटना ६ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास सर्वे गावाच्या हद्दीत सह्याद्री टुरिस्ट होम-गेस्ट हाऊससमोर घडली. या अपघातात सुरज सुहास सारंगे (वय ३१, रा. सर्वे, ता. मुरूड) यांचा मृत्यू झाला असून त्यांचा मित्र सचिन चंद्रकांत सुर्वे हा जखमी झाला आहे. सुरज सारंगे व सचिन सुर्वे हे दोघे मोटारसायकलवरून काशिदहून सर्वेकडे जात होते. सह्याद्री टुरिस्ट होमसमोर आल्यानंतर रस्त्यावर मोरीच्या कामासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात त्यांची दुचाकी पडली.
 
या ठिकाणी कोणतेही इशारा फलक, बॅरिकेड्स, बॅनर किंवा टेपिंग पट्टी लावण्यात आलेली नसल्याने ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. अपघातात सुरज सारंगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर सचिन सुर्वे यांना किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत.
 
या प्रकरणी मुरूड पोलिसांनी टरमॅट लिमिटेड व वराह इन्फ्रा लिमिटेड या कंपनीच्या संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा क्रमांक ४१/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१) व १२५ (अ)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रायगड ऑचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे आणि मुरूड पोलीस निरीक्षक परशूराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार जनार्दन गदमले करीत आहेत. दरम्यान, अलिबागमुरूड मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहनचालकांनी सावधगिरी बाळगून वाहन चालवावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.