अलिबाग | जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी (१२ मार्च) पार पडली. भाजपचे मंगेश वाकडीकर यांचा अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मधुकर पाटील यांचा प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी केली.
रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ सदस्यांसाठी निवडणूक ७ फेब्रुवारीला घेण्यात आली. त्यानंतर १२ मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बैठकीचे आयोजन केले. गुरुवारी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र भरण्याचा कालावधी होता. या वेळेत भाजपकडून अध्यक्षपदासाठी मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मधुकर पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला.
अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. निवड जाहीर झाल्यानंतर अध्यक्ष मंगेश वाकडीकर व उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी कुंटेबाग येथील रायगड जिल्हा परिषदेत आपल्या दालनात पदभार स्वीकारला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जालिंदर पठारे, यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख तसेच पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
झेडपीतून शेकाप हद्दपार...
रायगडमधील राजकारण शेकापशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे म्हटले जात असे. त्यातल्या त्यात रायगड जिल्हा परिषद म्हणजे शेकापचा प्राण समजला जात होता. गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत सर्वातमोठा शेकापक्ष होता.
मात्र यावेळी जिल्हा परिषदेत शेकापचा एकही सदस्य निवडून येऊ शकला नाही. त्यामुळे मागच्या सात वर्षांपर्यंत शेकापमय राहिलेली जिल्हा परिषद, आता ‘शेकाप लेस’ झाली आहे. शेकाप नेत्यांचे पक्षांतर आणि भावबंधकीमुळे हद्दपार होण्याची वेळ शेकापवर आली आहे.
भाजप-राष्ट्रवादीची विजयी सभा रद्द...
रायगड जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणून आणल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीची विजयी सभा अलिबाग किनार्यावरील मैदानावर होणार होती. मात्र ही सभा अचानक रद्द करण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.
अनेक कार्यकर्ते सभास्थळावर येऊन परत जात होते. भाजप नेते रविंद्र चव्हाण यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक मुंबईत बोलावून घेतल्याने ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती भाजपचे नेते सतिश धारप यांनी दिली. अलिबागमध्ये चर्चा मात्र वेगळीच रंगली होती.
पेणचा प्रयत्न, पण पनवेलचेच पारडे झाले जड!
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बहुतांशी सदस्य हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यातल्या त्यात जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांच्याकडे कामकाजाचा अनुभव होता. पेण तालुक्यातून चार जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आहेत.
अनुभवी वैकुंठ पाटील यांच्याकडे भाजपने गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे. अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची चिन्हे स्पष्ट झाल्यानंतर अध्यक्षपदाची धुरा वैकुंठ पाटील यांच्यावर सोपवण्यात येईल अशी चर्चा होते. आमदार रविंद्र पाटील तसेच दक्षिणेमधील भाजप नेत्यांचे प्रयत्नदेखील सुरु होते. मात्र संख्याबळ आणि निर्णायक भूमिका पनवेलकडेच असल्याने पक्षश्रेष्ठींकडून झुकते माप पनवेललाच मिळाले.