अलिबाग | रायगड जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी भाजपकडून मंगेश रामचंद्र वाकडीकर तर उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून मधुकर पाटील यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज दाखल झाले असून, निवडीची केवळ औपचारिकता राहिली आहे. मंगेश वाकडीकर हे उरण विधानसभा क्षेत्रातील केळवणे मतदारसंघातून निवडून आले होते.
रायगड जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महायुतीतील पक्षांची संयुक्त सत्ता राहणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीला सव्वा वर्षे आणि शिंदे शिवसेनेला अडिच वर्षे असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार भाजपकडून अध्यक्ष्यपदासाठी मंगेश वाकडीकर यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून करण्यात आली असून, त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मधुकर पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
अर्ज दाखल करतेवेळी मंत्री अदिती तटकरे, भाजपचे चिटणीस आ.प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, माजी आमदार अनिकेत तटकरे, शिवसेना नेत्या मानसी दळवी, विकास गोगावले, रसिका केणी, दिलीप भोईर चंद्रकांत कळंबे, आस्वाद पाटील, चित्रा पाटील, सुधाकर घारे, ॲड.प्रविण ठाकूर, अनंत गोंधळी यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी, शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
59 सदस्यसंख्या असलेल्या रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी 30 सदस्यांची आवश्यकता आहे. सध्या शिवसेनेचे 21, राष्ट्रवादी काँग्रेसचे 16 आणि भाजपचे 15 सदस्य विजयी झाले आहेत. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 5 आणि काँग्रेसचे 2 सदस्य निवडून आले आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्हा परिषद सत्तेसाठी विविध राजकीय घडामोडींना वेग आला होता. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला बाजूला ठेवत सत्ता स्थापनेची हालचाल केल्याची चर्चादेखील राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, महायुतीची सत्ता जिल्हा परिषदेत स्थापन होत आहे.