रायगड की सातारा? भाजपसमोर पेच..म्हणून जिल्ह्यात शिवसेना कार्यकर्ते प्रचंड आशावादी!

By Raigad Times    11-Mar-2026
Total Views |
ALIBAG
 
अलिबाग | असं म्हणतात आशेवर दुनिया कायम आहे...जिल्हा परिषदेत अध्यक्ष बसवण्याची पूर्ण तयारी भाजप राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी केली आहे. मात्र जिल्हा परिषदेत शिवसेनेचाच अध्यक्ष बसणार, असा प्रचंड आशावाद शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आहे. या आशावादाला एक मजबूत दुवा सातारा जिल्हा परिषदेचा आहे.
 
कारण या जिल्हा परिषदेत सर्वात जास्त जागा जिंकूनही सत्तेबाहेर बसण्याची वेळ भाजपवर आली आहे. जर सातारा हवा असेल तर भाजपला रायगड सोडावा लागणार आहे.रायगडमध्ये सर्वाधिक २१ जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे राजकीय हाडवैर सर्वश्रुत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सोबत घेतले आहे.
 
त्यामुळे सर्वाधिक सदस्य असूनही सत्तेच्या वाट्यासाठी शिवसेनेवर झगडण्याची वेळ आली आहे. याउलट परिस्थिती सातार्‍यामध्ये आहे. सातार्‍यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे राजकीय सूत चांगलेच जुळले आहे. त्यामुळे सर्वाधिक सदस्य असतानाही सातार्‍यात सत्तेबाहेर बसण्याची वेळ भाजपवर आली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड २० मार्च रोजी होणार आहे. कमळ चिन्हावर निवडून आलेले भाजपचे २७ आणि एका अपक्षाच्या पाठिंब्यासह सर्वाधिक २८ सदस्य असल्याने अध्यक्ष हा भाजपचाच झाला पाहिजे, अशी ठाम भूमिका भाजप नेते जयकुमार गोरे यांनी घेतली आहे.
 
परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस २०, शिवसेना १५, काँग्रेस १ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना १, अशा ३७ सदस्यांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजपकडून घोडेबाजार आणि फोडाफोडीच्या राजकारणाचा संभाव्य धोका ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या सदस्यांना सेफ स्टेट म्हणून दक्षिण भारतातील काँग्रेस शासित कर्नाटक, केरळच्या सहलीवर पाठवले आहे. सदस्यांची संपूर्ण बडदास्त ठेवण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांनी खास शिलेदारांवर सोपवली आहे. म्हैसूर, उटीमध्ये राष्ट्रवादीचे झेडपी सदस्य पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.
 
रायगडात शिवसेना शिंदे गटाकडून घोडेबाजार होऊ नये म्हणून गेले महिनाभर भाजप आणि राष्ट्रवादीचे सदस्य गोव्यामध्ये पर्यटन करत आहेत. रायगडात अध्यक्षपदाची निवड अवघ्या एक दिवसावर येवून ठेपली आहे. काऊंटडाऊन सुरू झाले आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँगे्रस, भाजपच्या सदस्यांसोबत गोवा पर्यटन करत आहे.
 
तर सातारामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या सदस्यांसोबत दक्षिण भारतातील कर्नाटक आणि केरळमध्ये ट्रीप एंजॉय करत आहे. दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी किंगमेकरच्या भूमिकेत दिसत आहे. रायगडात आज (१० मार्च) पर्यंत तरी भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांनीच सत्ता स्थापनेची तयारी केली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा सक्रिय सहभाग हे भाजपच्या कार्यकर्त्यांचे आशास्थान आहे. मात्र भाजपला सातार्‍यात सत्ता मिळवायची असेल तर रायगडावर पाणी सोडावे लागणार आहे आणि रायगडात अध्यक्ष बसवायचा असेल तर सातार्‍याची सत्ता सोडावी लागणार आहे.
 
एकंदरीत दुहेरी कात्रीमध्ये भाजप सापडली आहे आणि हेच कारण रायगडमध्ये शिवसेनेसाठी आशेचे किरण आहे. शिवसेना सत्तेत बसणार असे शिवसेना कार्यकर्ते म्हणत आहेत. असे असले तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेवटच्या क्षणाला काय निर्णय घेतात? यावर शिवतिर्थांवरील सत्तेचे गणित अवलंबून आहे.