प्रियकराकडून मोबाईल ब्लॉक, तरुणीची रेल्वेमधून खाडीत उडी , मच्छिमारांनी वाचवला जीव

By Raigad Times    11-Mar-2026
Total Views |
new mumbai
 
नवी मुंबई | प्रियकराने फोन ब्लॉक केल्याने एका विस वर्षीय तरुणीने चालत्या लोकलमधून खाडीत उडी मारल्याची घटना मंगळवारी (१० मार्च) सकाळी घडली. सुदैवाने, मच्छीमारांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ मदत केल्यामुळे या तरुणीचा जीव वाचला. ही घटना वाशी क्रिक या पुलावर घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली.
 
संबंधित तरुणी चेंबूर येथील रहिवासी आहे. ती हार्बर मार्गावरील लोकलने प्रवास करत असताना लोकल ट्रेन वाशी खाडी पुलावर आली. याचवेळी रागाच्या भरात तिने लोकलच्या दरवाजातून थेट खाडीत उडी घेतली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं. मात्र, तिच्या खांद्यावर असलेल्या बॅगमध्ये हवा भरल्याने ती पाण्यावर तरंगत राहिली. ही घटना पाहताच वाशी गावातील मच्छिमारांनी तात्काळ धाव घेतली.
 
मच्छिमार महेश सुतार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी बोट घेऊन काही मिनिटांत त्या ठिकाणी पोहोचत तरुणीला पाण्यातून बाहेर काढले. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला. तरुणीला सुरक्षित किनार्‍यावर प्राथमिक चौकशीत तिच्या प्रियकराने ब्लॉक केले होते. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. याच रागाच्या भरात तिने टोकाचा निर्णय घेतला होता.