पनवेल | नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत सुरू असलेल्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेदरम्यान शक्तिवर्धक औषधांचा वापर केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. भरती मैदानात संशयास्पद हालचाली करणार्या चार उमेदवारांची पोलिसांनी तपासणी केली असता त्यांच्या ताब्यात इंजेक्शने आढळून आली.
चौकशीदरम्यान मैदानी चाचणीमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांनी शक्तिवर्धक औषध इंजेक्शनद्वारे घेतल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत २०२४-२५ या वर्षासाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांतून हजारो उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी सहभागी झाले असून ११ फेब्रुवारी २०२६ पासून कागदपत्र पडताळणी, शारीरिक क्षमता चाचणी, धावणे तसेच इतर मैदानी चाचण्या घेतल्या जात आहेत. उमेदवारांची शारीरिक क्षमता, सहनशक्ती व वेग यांची कसोटी पाहण्यासाठी या चाचण्यांना विशेष महत्त्व असते. दरम्यान, ९ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास भरती मैदानात ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास काही उमेदवार संशयास्पद हालचाली करत असल्याचे आले.
हे उमेदवार वारंवार एका बाजूला जाऊन काहीतरी करत असल्याचे पोलिसांनी पाहिले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर लक्ष ठेवत चौकशी केली. संशय अधिक गडद झाल्यानंतर संबंधित चार उमेदवारांची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यात बिडी यु ४० इन्शुलन प्रकारची इंजेक्शने निडलसह आढळून आली. प्रत्येक उमेदवाराकडे एक असे एकूण चार इंजेक्शने मिळून आली.
याचा वापर शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी किंवा शरीराला तात्पुरती ऊर्जा देण्यासाठी केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी तत्काळ ही इंजेक्शने पंचांसमक्ष जप्त करून सीलबंद केली. तसेच आरोपींकडील पोलीस शिपाई भरतीसाठी भरलेले अर्ज आणि संबंधित कागदपत्रेही तपासासाठी ताब्यात घेण्यात आली. प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपी उमेदवारांनी मैदानी चाचणीमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी शक्तिवर्धक औषध इंजेक्शनद्वारे घेतल्याची माहिती दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
तीन जण अहिल्यानगर आणि एक उमेदवार पुणे जिल्ह्यातील असल्याचे उघड झाले. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन संबंधित चारही उमेदवारांना पुढील वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून रक्त व लघवीचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या नमुन्यांचा तपासणी अहवाल आल्यानंतर औषधाचा नेमका प्रकार, त्याचा शरीरावर झालेला परिणाम आणि त्याचा वापर झाल्याची खात्री होणार आहे. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई गोविंद अंकुश झालटे यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांच्या तक्रारीवरून संबंधित चारही उमेदवारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिवराम दफळ करीत असून आरोपींना ही इंजेक्शने कोठून मिळाली, त्यामागे कोणते जाळे कार्यरत आहे का, तसेच इतर उमेदवारांनीही अशा प्रकारे शक्तिवर्धक औषधांचा वापर केला आहे का? याबाबतही तपास केला जात आहे.