अलिबाग । अलिबाग तालुक्यातील राजमळा येथे लागलेल्या भीषण आगीत मदतीसाठी धावलेल्या एका 35 वर्षीय तरुणाचा होरपळून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कैलास अरविंद पाटील (रा. थळ, ता.अलिबाग) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे राजमळा व थळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
5 जानेवारी रोजी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास राजमळा येथे अचानक आग लागली. आग वेगाने पसरत असल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. यावेळी कर्तव्य भावनेतून कैलास पाटील हेही घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याच्या प्रयत्नात सहभागी झाले. आग विझवणे सुरु असताना परिसरात मोठ्या प्रमाणात दाट धूर साचला होता. या धुरामुळे कैलास यांना अचानक चक्कर आली आणि ते आगीच्या ज्वाळांमध्ये कोसळले.
यावेळी अन्य नागरीकांनी तात्काळ त्यांना बाहेर काढले; मात्र तोपर्यंत ते गंभीररीत्या भाजले गेले होते. त्यांना तातडीने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आग विझवण्यासाठी पुढे आलेल्या तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.