अलिबाग । रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराच्या तोफा गुरुवारी संध्याकाळी थंडावल्या आहेत. उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गेल्या पंधरा दिवसांत वाड्या वस्त्या पिंजून काढल्या. पायाचे तळवे झोंबायला लागले होते. प्रचार संपला असला तरी प्रत्यक्ष मतदान उद्या शनिवारी आहे.
त्यामुळ मतदारांना घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंतचा सर्वांत कठीण टास्क अजून बाकी आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी होणार्या निवडणुकीसाठी एकूण 173 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाने 40 उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने 29 उमेदवार, शिवसेना ठाकरे गटाने 20 उमेदवार, शेकापने 18 तर काँग्रेसने 8 उमेदवार, मनसेने 3 उमेदवार तर आम आदमी पार्टीने 1 जागेवर उमेदवार दिला आहे. राजकीय पक्षांसोबतच 20 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
तर पंचायत समितीच्या 118 जागांसाठी होत्या. पैकी महाड येथील एक जागा बिनविरोध झाल्यामुळे 117 जागांसाठी 328 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्वच उमेदवारांनी गेले पंधरा दिवस प्रचाराचा धुरळा उडवला होता. मात्र गुरुवारी (5 फेब्रुवारी) प्रचार थांबला आहे. गुरुवारची रात्र आणि शुक्रवारी प्रचार नसला तरी हा दीड दिवस मतदारांना मस्का लावण्याची खास वेळ मानली जाते.
ज्याच्या मस्का जास्त त्याचा पेपर सोपा, अशी चर्चा आहे जिल्ह्यात एकूण 17 लाख 381 मतदार मतदानाचा हक्क बजाणार आहेत. त्यात पुरुष मतदार 8 लाख 46 हजार 347, तर स्त्री मतदार 8 लाख 54 हजार 9 व इतर 25 मतदार आहेत. प्रत्येक मतदारास दोन मते देण्याचा अधिकार राहणार असून, एक मत जिल्हा परिषद सदस्यासाठी व दुसरे पंचायत समिती सदस्यासाठी असणार आहे. सर्वाधिक मतदारसंख्या पनवेल तालुक्यात असून येथे 2 लाख 79 हजार 796 मतदार आहेत.
त्यामध्ये 1 लाख 43 हजार 748 पुरुष, 1 लाख 36 हजार 032 महिला आणि 20 इतर मतदारांचा समावेश आहे. कर्जत तालुक्यात 1 लाख 10 हजार 602, खालापूरमध्ये 1 लाख 10 हजार 182, सुधागडमध्ये 43 हजार 498, पेणमध्ये 1 लाख 39 हजार 491, उरणमध्ये 1 लाख 08 हजार 420, अलिबागमध्ये 2 लाख 8 लाख 923 तर मुरुड तालुक्यात 55 हजार 542 मतदार नोंदणीकृत आहेत. तळा तालुक्यात 32 हजार 222, माणगावमध्ये 1 लाख 39 हजार 491, म्हसळ्यात 43 हजार 439, श्रीवर्धनमध्ये 46 हजार 526, महाडमध्ये 1 लाख 39 हजार 486 आणि पोलादपूर तालुक्यात 39 हजार 242 मतदार आहेत.
आकडा फुटला? कोणी नाही पाहिला!
जिल्हा परिषद, पंचायत समितीची ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय आकडा फुटतो? याची चर्चा रंगली होती. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 4 अंकी आकडा फुटल्याची चर्चा आहे. काहीजण फोन करुन उमेदवाराला आपल्याला मिळाले नसल्याचे सांगतात.
काहींना गाडीभाड्यासकट सर्व करावे लागते असे म्हटले जाते. निवडणुकांसाठी किती खर्च करावा, यासाठी उमेदवाराला शासनाकडून निर्बंध घातले जातात. मात्र तरीही निवडणुकीत पैशांचा पूर येतो. अशाप्रकारे कुठलेही प्रलोभन घातले जाऊ नये, असे आवाहन शासनाकडून वारंवार केले जाते; मात्र तरीही हा प्रकार थांबत नसल्याचे समजते.