मुरुडच्या नगराध्यक्षा आराधना दांडेकर अडचणीत , आचारसंहिता भंग केल्याने, ‘कारणे दाखवा’ नोटीस

शासकीय दालनातून उमेदवारांचा प्रचार केल्याचा ठपका

By Raigad Times    06-Feb-2026
Total Views |
murud
 
मुरुड । मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आराधना दांडेकर यांना ‘आचारसंहितेचा भंग व शासकीय पदाचा गैरवापर’ केल्याबाबत निवडणूक अधिकार्‍यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. आराधना दांडेकर यांनी शासकीय दालनातून राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार केल्याची तक्रार शिवसेना गटनेते पांडूरंग आरेकर यांनी केली होती.
 
जिल्हा परिषद निवडणुकीत, नगराध्यक्षा दांडेकर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणारा व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. याची तक्रार शिवसेनेने केली होती. शिवसेनेच्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने नगराध्यक्षांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
 
त्यामुळे त्या अडचणीत आल्या आहेत. या प्रकरणामुळे मुरुड तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तक्रारीनंतर संबंधित व्हिडिओची तपासणी करण्यात आली असता नगराध्यक्षा आराधना दांडेकर शासकीय कार्यालयातील अधिकृत दालनात बसलेल्या दिसतात. नगरपरिषदेचा अधिकृत फलक व शासकीय वातावरण स्पष्टपणे दिसून येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 च्या आदेशानुसार कोणत्याही पक्षाचा किंवा उमेदवाराच्या प्रचारासाठी शासकीय अथवा निमशासकीय संस्थांच्या इमारती, कार्यालये किंवा आवाराचा वापर करण्यास मनाई आहे.
 
त्यामुळे प्रथमदर्शनी निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नगराध्यक्षांना 24 तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निर्धारित मुदतीत समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास संबंधितांविरुद्ध पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे. या घटनेमुळे मुरुड तालुक्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत प्रशासन किती सतर्क आहे, याचीही चर्चा सुरू झाली आहे.