लाडक्या बहिणी पोरक्या झाल्या ! खा. सुनील तटकरे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

रायगड जि.प. पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी खा. सुनील तटकरे प्रचारात

By Raigad Times    05-Feb-2026
Total Views |
alibag
 
अलिबाग । महाराष्ट्राच्या जडणघडणीत दादांचे मोठे योगदान असून हे आपल्याला कदापी विसरता येणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जनक म्हणून दादांकडे पाहिले जात होते. दादा आज हयात नसल्याने लाडक्या बहिणी पोरक्या झाल्या आहेत, असे उद्गार राष्ट्रवादीचे नेते खा.सुनील तटकरे यांनी काढले.
 
अदितीला त्यांनी मुलीप्रमाणे प्रेम दिले. त्यांची आठवण कायम स्मरणात राहील, असेही ते यावेळी म्हणाले.जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात सुरु झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठा आघात झाला, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे अचानक अपघाती निधन झाले. या घटनेनंतर पक्षाचे कार्यकर्ते शोकसागरात बुडून गेले होते. निवडणुकीचा प्रचार थांबला होता. कार्यकर्ते बिथरुन गेले.
 
मात्र दुःख बाजूला सारुन, अजितदादांचा पक्ष सावरण्यासाठी खा. तटकरे कामाला लागले आहेत. मतदानाला दोन दिवस उरलेले असताना राष्ट्रवादीचा प्रचार पुन्हा सुरु झाला आहे. बुधवारी (4 फेबु्रवारी) खा. सुनील तटकरे यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेत विजय मिळवून दादांना सर्मपीत करायचा आहे, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
 
दादांच्या कार्याची आठवण, त्यांचा आदर्श पाळून पक्षाला ताकदीने उभे करणे हीच सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचार तर करत आहेत; मात्र अजितदादांचा मृत्यू ते पचवू शकलेले नाहीत. व्यासपीठावरील त्यांचे छायाचित्र पाहून कार्यकर्ते चलबिचल होताना दिसत आहेत. दादांच्या फक्त आठवणी उरल्या आहेत, असे म्हणत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भावूक होताना पहायला मिळत आहेत.