अलिबाग । 12 वीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार आहेत, तर 10 वीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत पार पडणार आहेत. या परीक्षांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व परीक्षा वितरण केंद्रे व परीक्षा केंद्रांवर संबंधित निर्बंध लागू राहणार आहेत.
मनाई आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या 50 मीटर परिसरात मोबाईल फोन, पेजर, एस.टी. डी. बुथ, झेरॉक्स मशिन व फॅक्स मशिन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येक पेपरच्या 24 तास आधीपासून झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देखील दिले आहेत.
तसेच, प्रत्येक पेपरच्या एक तास आधीपासून पेपर संपल्यानंतर एक तासापर्यंत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, परीक्षार्थी विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी वगळता इतर कोणत्याही व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या 50 मीटर परिसरात फिरण्यास मनाई राहणार आहे. परीक्षेसाठी आवश्यक साहित्याव्यतिरिक्त कोणतेही आक्षेपार्ह साहित्य वापरण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई आणि शिक्षा करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.