पनवेल । पनवेल तालुक्यात भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत वाद आता उघडपणे चव्हाट्यावर आला आहे. विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर आणि विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांच्यातील मतभेद सार्वजनिक झाल्याने भाजपच्या स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद उफाळून आला असून तो प्रदेशाध्यक्षांच्या दरबारात जाण्याची शक्यता आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना आमदार विक्रांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निधी वाटप करताना तालुकाध्यक्ष, बूथ प्रमुख तसेच पक्ष पदाधिकार्यांना विश्वासात न घेता शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार निधी दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
ही बाब पक्षाच्या धोरणांच्या विरोधात असून संघटनात्मकदृष्ट्या नकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या निधी वाटपाच्या पद्धतीमुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे ठाकूर यांनी सांगितले. ‘आम्ही कोणती भूमिका घ्यायची?’ असा प्रश्न कार्यकर्ते आणि पदाधिकारी विचारत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पक्षाच्या विरोधात काम सुरू राहिल्यास स्वतःला स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. या संपूर्ण प्रकरणाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केले आहे.
पक्ष पातळीवर हा प्रश्न सोडवला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असून नेतृत्व कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आ. प्रशांत ठाकूर हे चार वेळा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सलग तीन वेळा ते भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आले आहेत. 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पनवेलमधील पक्ष नेतृत्व त्यांच्या हातात आले. त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद, सिडको महामंडळाचे अध्यक्षपद अशा महत्त्वाच्या जबाबदार्या देण्यात आल्या.
पनवेलमध्ये भाजप संघटना उभारण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो. विक्रांत पाटील यांनी भाजप युवा मोर्चामधून काम करत प्रदेशाध्यक्षपदापर्यंत मजल मारली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषद आमदारकी देण्यात आली. आमदार झाल्यानंतर त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघाशी संबंधित प्रश्न विधिमंडळात सातत्याने उपस्थित केले.
नैना सिडको घरांचा प्रश्नांवर लक्ष वेधले. विधान परिषद आमदारकीचा उपयोग करून विक्रांत पाटील यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. काही नाराज कार्यकर्त्यांना जवळ करण्याचे प्रयत्न झाले. यामुळे गेल्या वर्षभरात दोन्ही आमदारांमधील संबंध.ताणले गेले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पनवेल महानगरपालिका निवडणुकीदरम्यान तिकीट वाटपावरून हे मतभेद अधिक ठळक झाले. विक्रांत पाटील यांनी आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते.
मात्र अंतिम निर्णय आमदार प्रशांत ठाकूर यांचाच मानला गेला. पत्नी मोहिनी पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरण्यात आला होता, परंतु कुटुंबीयांना उमेदवारी न देण्याच्या निर्णयामुळे ती शक्य झाली नाही. यानंतर त्यांच्या भगिनी स्नेहल ढमाले यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडणूक जिंकली. परंतु पक्षाने दिलेल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे जोरदार चर्चा झाली. निवडून आलेल्या अपक्ष नगरसेविकेचा भाजपमध्ये समावेश न केल्याने मतभेद अधिकच वाढले. सध्या पनवेल महानगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही पक्ष जोरदार तयारी करत आहे. मात्र अशा वेळी पक्षातील अंतर्गत गटबाजी सार्वजनिक झाल्याने भाजपसाठी ही मोठी संघटनात्मक कसोटी ठरत आहे.या वादावर पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व कोणती भूमिका घेते, समेट साधते की कठोर निर्णय घेते, यावर पनवेलमधील भाजपचे भवितव्य काही अंशी अवलंबून राहणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा वाद मिटतो की आणखी चिघळतो, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आ.प्रशांत ठाकूर हे वरिष्ठ आमदार आहेत. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया ही वादातून नसून ती गैरसमजातून आहे.मी गेल्या 22 वर्षांपासून भारतीय जनता पक्षामध्ये काम करत आहे. आमदार निधी देताना जनहिताचा विचार करून तो दिला गेला आहे. त्याचा फायदा भाजपला नक्कीच होईल. त्यातून पक्ष वाढीसाठी मदत झाल्याशिवाय राहणार नाही. ते सुद्धा लोककल्याणासाठी काम करतात आणि मी सुद्धा त्याच भावनेने आमदार म्हणून गेल्या वर्षभरापासून कार्यरत आहे. अनेक पदांवर मी काम केल्यास भाजपचे हित हेच माझ्यासाठी प्रमाण आहे. -विक्रांत पाटील, आमदार, विधान परिषद