सत्तेची ‘मॅजिक फिगर’ शिवसेना गाठणार का ? निकालानंतर छोटे पक्ष एकत्र येऊन गेम करणार । जिल्ह्यात चर्चा

03 Feb 2026 17:07:54
 alibag
 
अलिबाग । असे म्हणतात, पराभव आधी मनात होतो, नंतर मैदानात... रायगडात असेच काहीसे चित्र आहे. सात वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत सत्तेत होते त्यांनी या निवडणुकीआधीच अवसान गाळले की काय? असा प्रश्न पडावा, याचे कारण शिवसेना शिंदे गट आणि भाजप वगळता जिल्ह्यातील अन्य राजकीय पक्ष ‘शिवतीर्था’वर एकहाती सत्ता मिळवण्याच्या तयारीने उतरल्याचे दिसत नाही.
 
पुरेसे उमेदवारच मैदानात उतरवले नाहीत तर सत्तेची ‘मॅजिक फिगर’ गाठणार कशी? याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी होणार्‍या निवडणुकीत एकूण 173 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सर्वत्र जोरदार प्रचार सुरु आहे. मात्र सत्तेच्या गणिताची चर्चादेखील दुसरीकडे सुरु आहे.
 
59 पैकी ज्या पक्षाचे 30 उमेदवार निवडून येतील त्याची सत्ता जिल्हा परिषदेवर येणार आहे. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने 40 उमेदवार उभे करुन जिल्हा परिषदेवर एकहाती भगवा फडकविण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. यानंतर भाजपने 30 उमेदवार दिले आहेत. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत शेकाप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. शेकापचे 23, शिवसेनेचे 18, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12, तर भाजप व काँग्रेसचे प्रत्येकी 3 सदस्य निवडून आले होते.
 
त्यावेळी शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने सत्ता स्थापन केली होती. अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले होते. 2026 मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने 29 आणि ठाकरे सेनेने 20 उमेदवार उभे केले आहेत. एकेकाळी जिल्ह्यात बलाढ्य समजल्या जाणार्‍या शेकापने 18 तर काँग्रेस केवळ 8 उमेदवार उतरवू शकली आहे. मनसेने 3 तर आम आदमी पार्टीने एका जागेवर उमेदवार दिला आहे.
 
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कुठेही थेट युत्या, आघाड्या झालेल्या नाहीत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांविरोधात लढत देत आहेत. अन्य पक्षांनीही सोयीची सोयरीक केलेली आहे. राजकीय पक्षांसोबतच 20 अपक्ष उमेदवारदेखील नशीब आजमावत आहेत. रायगड जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्यासाठी 59 जागांसाठी 30 ची ‘मॅजिक फिगर’ गाठावी लागणार आहे. हा आकडा गाठण्यासाठी केवळ शिवसेनेने उमेदवार मैदानात उतरवले आहेत. शिवसेना या प्रयत्नात यशस्वी होणार की, निकालानंतर छोटे छोटे पक्ष एकत्र येऊन शिवसेनेचा गेम करणार, हे पाहण्यासारखे असणार आहे.
Powered By Sangraha 9.0