रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका 7 फेब्रुवारीला मतदानासाठी सुट्टी

By Raigad Times    03-Feb-2026
Total Views |
 mumbai
 
मुंबई । राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना आणि कारखान्यांमधील कामगार व कर्मचारी यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक असल्याचे उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत.
 
या आदेशानुसार, मतदानक्षेत्रातील मतदार असलेल्या कामगार, अधिकारी आणि कर्मचार्‍यांसह कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर असलेल्या मतदारांना देखील मतदानासाठी सुट्टी देणे आवश्यक आहे. ही सुट्टी सर्व प्रकारच्या उद्योग, कारखाने, दुकाने, आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, माल्स, रिटेलर्स, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे आणि इतर व्यावसायिक उपक्रमांवर लागू राहणार आहे.
 
अपवादात्मक परिस्थितीत जर मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल असे धोकादायक किंवा लोकोपयोगी सेवा देणार्‍या आस्थापनांमध्ये पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदानासाठी दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे आवश्यक आहे.