वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांना , टोलचे ५.१६ कोटी परत मिळणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील कोंडीबाबत एमएसआरडीसीचा निर्णय

By Raigad Times    23-Feb-2026
Total Views |

mumbai
 
मुंबई | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या वाहतूक कोंडीनंतर वाहनचालकांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे १.२ लाख वाहनधारकांना एकूण ५.१६ कोटी रुपयांचा टोल परतावा देण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. हा परतावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत संबंधित वाहनचालकांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम जमा केली जाणार आहे.
 
३ फेब्रुवारी रोजी खोपोली परिसरात गॅस टँकरचा अपघात झाल्यानंतर एक्स्प्रेस वेवर तसेच लगतच्या महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तब्बल ३२ तासांहून अधिक काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हजारो प्रवासी रस्त्यावर अडकून पडले होते. अनेकांना पाणी, अन्न तसेच इतर मूलभूत सुविधांचा अभाव सहन करावा लागला. अपघातानंतर प्रशासनाने तातडीने टोल वसुली थांबविण्याचे आदेश दिले होते.
 
मात्र, तोपर्यंत काही वाहनधारकांच्या खात्यांतून टोलची रक्कम वजा झाली होती. या व्यवहारांची तपासणी करुन संबंधित रक्कम परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, आदेशानंतरही ज्या वाहनधारकांकडून टोल वसूल झाला आहे, त्यांना पूर्ण परतावा दिला जाणार आहे. या परताव्यात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेबरोबरच पुणे-बंगळुरू महामार्गावरील टोलचाही समावेश असणार आहे.
 
टोलवसुली करणार्‍या या कंत्राटदार कंपनीकडून व्यवहारांचा तपशील मागवण्यात आला होता. टोल नाक्यांवरील बॅरिअर्स पूर्णपणे उघडण्यापूर्वी काही व्यवहार आपोआप प्रक्रिया झाले असण्याची शक्यता अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. अशा सर्व व्यवहारांचा डेटा तपासून संबंधित प्रवाशांना पैसे परत केले जाणार आहेत. या घटनेनंतर टोल परताव्याची मागणी जोर धरत होती. आता सुमारे १.२ लाख वाहनचालकांना ५ कोटींहून अधिक रक्कम परत मिळणार असल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.