माणगाव । भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचे बुधवारी (ता. 25 नोव्हेंबर) माणगाव येथील काँग्रेस कमिटी कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आले. तालुका काँग्रेस आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत हा स्वागत सोहळा पार पडला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, तालुकाध्यक्ष डॉ. नरेंद्र सिंह, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष विलास सुर्वे, जिल्हा कोषाध्यक्ष रामप्रकाश कुशवाह, म्हसळा तालुकाध्यक्ष नाझिमा मुकादम, अशोक जैन यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना सकपाळ यांनी संविधान दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.
भारतीय संविधानातील लोकशाही आणि स्वराज्याची मूल्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या विचारातून प्रेरित आहेत. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यलढा पुढे गेला. त्यानंतर शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा संविधानात रुजवण्यात आला, असे ते म्हणाले. संविधान वाचन या यात्रेला काँग्रेसचा पाठिंबा असून, पक्ष संयोजकाची भूमिका बजावत आहे. यात्रेत सहभागी होण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.