अलिबाग । परदेशातून भारतात येण्यासाठी भारतीय चलनाची गरज असल्याचे सांगत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून अलिबागमधील एका महिलेची 5 लाख 3 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप कॉलद्वारे ओळख वाढवून अज्ञात व्यक्तीने टप्प्याटप्प्याने ही रक्कम उकळली.
याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.47 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अज्ञात भामट्याने व्हॉट्सअॅप कॉलद्वारे फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून ओळख निर्माण केली.
त्यानंतर आपण परदेशातून भारतात येणार असून, त्यासाठी भारतीय चलनाची ते दुप्पट करून परत देण्याचे खोटे आश्वासन त्याने दिले. आवश्यकता असल्याचे सांगितले. फिर्यादी यांनी पैसे दिल्यास या आमिषाला बळी पडून सदर महिलेने समोरील व्यक्तीच्या सांगण्यावरून ऑनलाईन माध्यमातून तसेच बँक खात्याद्वारे टप्प्याटप्प्याने एकूण 5 लाख 3 हजार रुपये पाठवले. मात्र, पैसे मिळाल्यानंतर त्या व्यक्तीने रक्कम परत केली नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 (2008 च्या सुधारणेसह) कलम 66 (ड) आणि भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे करीत आहेत.