अलिबाग । अलिबागमधील नागाव-रेवदंडा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान रस्त्याच्या मध्यभागी ठेवलेल्या मातीच्या ढिगार्याला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात बोरपाडा येथील प्रकाश काशिनाथ भगत (वय 54) यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात अखेर ठेकेदारासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग पोलिसांनी या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या निष्काळजीपणाबद्दल रस्ता बांधकाम करणार्या कंपनीच्या ठेकेदारासह इंजिनियर आणि देखरेख करणार्या सल्लागार कंपनीच्या टीम लिडरविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. नागाव येथील खारगल्ली बसथांब्याजवळ आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीमार्फत काँक्रिटीकरणाचे काम सुरु असताना खोदकामातील मातीचा मोठा ढिगारा रस्त्याच्या मध्यभागी ठेवण्यात आला होता.
मात्र, वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी कोणतेही बॅरिकेड्स, ब्लिंकर लाईट्स किंवा धोक्याचे सूचना फलक लावण्यात आले नव्हते. याच निष्काळजीपणामुळे 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे 7.15 वाजता हा भीषण अपघात घडला होता. प्रकाश भगत हे रेवदंडा येथून नागावच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना अंधारात रस्त्यावरील मातीचा ढिगारा त्यांच्या लक्षात आला नाही. दुचाकी ढिगार्यावर आदळून समोरील खड्ड्यात कोसळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी ठेकेदार जगदिस्वरण राजू, इंजिनियर इंजिनियर प्रेमचंद मुरली आणि सल्लागार कंपनीचे टीम लिडर रामकिसन शर्मा यांच्यावर कर्तव्यात कसूर व निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी 20 नोव्हेंबर रोजी अलिबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. अपघातानंतर आता गुन्हा दाखल झाल्याने रस्त्याच्या कामादरम्यान सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणार्या संबंधित यंत्रणेच्या जबाबदारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.