नवी मुंबई | केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ भारत मिशनअंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’मध्ये नवी मुंबईने देशातील सर्वो त्कृष्ट स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांक पटकावला आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित पुरस्कार वितरण समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि शहर अभियंता शिरीष आरदवाड उपस्थित होते.
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर, राज्यमंत्री तोखन साहू आणि मंत्रालयाचे सचिव सत्येंद्र सिंग यांचीही समारंभाला उपस्थिती होती. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांचीदेखील यावेळी उपस्थिती होती. देशातील स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने आघाडीवर राहिली आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येयवाक्य समोर ठेवून महापालिकेने स्वच्छतेच्या क्षेत्रात नियोजनबद्ध प्रयत्न सुरू ठेवले होते. यंदा देशातील ४,७५१ शहरांमधून नवी मुंबईने प्रथम क्रमांक मिळवत सर्वोत्तम स्वच्छ शहराचा बहुमान पटकावला. स्वच्छताकर्मी, नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे महापालिकेने नमूद केले आहे.
या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना महापौर सुजाता पाटील म्हणाल्या की, नवी मुंबईतील प्रत्येक नागरिकासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. शहराचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्याचा बहुमान मिळणे ही आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार नवी मुंबईतील सर्व नागरिकांना, तसेच स्वच्छतेसाठी सर्वाधिक योगदान देणार्या स्वच्छतामित्र आणि स्वच्छतासखींना समर्पित करत असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमहापौर दशरथ भगत यांनीही शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार्या स्वच्छताकर्मींच्या योगदानाचे विशेष महत्त्व अधोरेखित केले. आगामी काळात ‘सुगंधी शहर अभियान’च्या माध्यमातून स्वच्छतेच्या क्षेत्रात आणखी चांगले काम केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या यशाचे श्रेय नागरिक आणि स्वच्छताकर्मींच्या सामूहिक प्रयत्नांना दिले.
स्वच्छता व्यवस्थेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याला नागरिकांचा मिळालेला सक्रिय सहभाग यांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. त्यामुळे नवी मुंबईला देशात प्रथम क्रमांक मिळवता आला, असे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत मिशनशहरीअंतर्गत नवी मुंबईने सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शहराने ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये स्थान मिळवण्याबरोबरच सप्ततारांकित कचरामुक्त शहर आणि ‘वॉटर प्लस’ ही प्रमाणपत्रेही कायम राखली आहेत.