नवी मुंबई | कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसाच्या अंगावर भरधाव कार घालून त्यांना तब्बल २०० मीटरपर्यंत फरफटत नेल्याची संतापजनक घटना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात घडली. या घटनेत पोलीस कॉन्स्टेबल दिलीप भोई गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सत्यम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
कळंबोली परिसरात पोलिसांकडून नियमित वाहन तपासणीसाठी नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी भरधाव वेगाने येणार्या स्विफ्ट डिझायर कारला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने कारचा वेग कमी करण्याऐवजी थेट कर्तव्यावर असलेल्या कॉन्स्टेबल दिलीप भोई यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे भोई कारच्या बोनेटवर फेकले गेले. जीव वाचवण्यासाठी त्यांनी बोनेट घट्ट पकडून ठेवले. मात्र, चालकाने कार न थांबवता भरधाव वेगात पुढे नेली.
त्यामुळे भोई यांना सुमारे २०० मीटरपर्यंत फरफटत जावे लागले. काही अंतरावर ते खाली कोसळताच चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत जखमी झालेल्या भोई यांना तातडीने कळंबोलीतील सत्यम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासात आरोपींनी गुन्ह्यासाठी बनावट नंबर प्लेट असलेल्या कारचा वापर केल्याचे समोर आले आहे.