रायगड जिल्हा परिषदेवर भगवा फडकवणार-आ.महेंद्र दळवी

05 Jan 2026 16:28:21
 alibag
 
अलिबाग । आमागी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकणार असा विश्वास आलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला. शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. अलिबाग तालुक्यातील थळ मधून मानसी दळवी, आवास गटातुन दिलीप भोईर उर्फ छोटम तर कुर्डूसमधून रसिका राजा केणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
 
आ. महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या आढावा बैठका सुरु आहेत. यामध्ये संघटनात्मक मजबुती, बूथनिहाय नियोजन आणि आगामी निवडणुकांसाठीची रणनीतीवर चर्चा करण्यात आली. शुक्रवारी (2 जानेवारी) झिराड येथे आवासची तर रविवारी कुर्डूस मतदारसंघात बैठक पार पडली.
 
alibag
 
आवासमधून जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर तर कुर्डूसमध्येही रसिका केणी यांचे नाव निश्चित करण्यात आले. उमेदवारांच्या नावावर एकमत झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. केणी आणि भोईर यांनी आ. दळवी यांना धन्यवाद दिले आहेत. झिराडमधून दिलीप भोईर यावेळी विजयाची हँट्रीक करणार तर कुर्डूसमध्ये राजा केणी यांच्या पत्नी रसिका केणी पहिल्यांदाच भगवा फडकवून इतिहास रचतील, असा विश्वास आ. दळवी यांनी व्यक्त केला आहे.
 
या दोघांनी आपपल्या मतदारसंघात अनेक वर्षे पक्षांची बांधणी केली आहे. त्यामुळे विजयही त्यांचाच असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी, पक्षाचे नेते दिलीप भोईर, दिपकजी रानवडे, नेत्या मानसी दळवी, महिला तालुका भाग्यता पाटील, झिराडच्या माजी सरपंच दर्शना भोईर यांच्यासह आवास आणि कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघातील अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0