राष्ट्रवादी काँग्रेस घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी राहणार-फडणवीस

31 Jan 2026 13:47:22
 mumbai
 
मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत झालेल्या विमान अपघातात निधन झाल्यानंतर राजकीय घडामोडी सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक आज मुंबईत होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड केली जाणार आहे.
 
याशिवाय त्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी माहिती देखील समोर आली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच घेईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही सरकार म्हणून भाजप पक्ष म्हणून उभे राहणार आहोत. अजित दादाचं कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आम्ही त्याच्या पाठीशी असून पूर्णपणे उभे आहोत, त्यांच्या निर्णयाला आमचे समर्थन असेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माझ्याशी चर्चा करून गेलेले आहेत. त्यांची कार्यपद्धती आणि काय पर्याय आहेत त्याबाबत त्यांनी चर्चा केली.
 
अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल. त्या संदर्भात मी बोलणे योग्य होणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. अजित दादांनी अर्थसंकल्पासंदर्भात भरपूर तयारी केली होती. उद्यापासून मी लक्ष घालून ज्या काही प्रोसेस आहेत, त्या पूर्ण करणार आहे. आम्ही त्यानंतर एकत्रपणे ठरवू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. सुनेत्रा पवार यांच्यासंदर्भात सांगितले त्यापेक्षा जास्त अधिक सांगता येणार नाही, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
 
 
Powered By Sangraha 9.0