सुनेत्रा पवार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री? राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची आज मुंबईत बैठक

By Raigad Times    31-Jan-2026
Total Views |
 mumbai
 
मुंबई । अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. आज शनिवार, दि. 31 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक दुपारी 2 वाजता विधिमंडळातील सभागृहात होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होणार आहे.
 
त्यानंतर त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी 5 वाजता पार पडेल, अशी माहिती आहे. यासाठी शुक्रवारी रात्री सुनेत्रा पवार, जय पवार हे बारामतीतून मुंबईकडे रवाना झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “शनिवारी दुपारी 2 वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.
 
पक्षाचे विधानसभा, विधानपरिषद सदस्य आणि खासदार उपस्थित राहतील. जो निर्णय घेऊ त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना कळवण्यात येईल. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनाही हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.” शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल.
 
यानंतर पक्षाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवडीचे पत्र दिले जाणार आहे. ही निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीसाठी कोणतीही जय्यत तयारी केली जाणार नसून, अत्यंत साधेपणाने तो पार पडेल अशी माहिती आहे. या शपथविधीनंतर सुनेत्रा पवारांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होईल.
 
छगन भुजबळ काय म्हणाले ?
“दादा गेले आणि ज्या पद्धतीने ते गेले त्यामुळे सर्वांची झोप उडाल्यासारखे झाले आहे. आता कोणाकडे तरी सर्व जबाबदारी देऊन पक्ष किंवा सरकार चालवावे तर लागणार आहे. विधीमंडळाच्या सदस्यांची शनिवारी बैठक बोलावली आहे. त्याच्यात विधिमंडळ पक्षनेतेपद जे अजित पवारांकडे होते ते देण्यासंदर्भात निर्णय होईल. सुनेंत्राताईंकडे पद द्यावे अशी अनेकांची मागणी आहे आणि ते चूक आहे असे वाटत नाही. पण निर्णय बैठकीत होईल”, असे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.