किल्ले रायगड मार्ग होणार सुरक्षित , नातेखिंड येथे डोंगर फोडण्याच्या कामाला अखेर सुरुवात

By Raigad Times    31-Jan-2026
Total Views |
 mahad
 
महाड । महाड तालुक्यातील किल्ले रायगडकडे जाणार्‍या मुख्य मार्गावरील नातेखिंड येथे दोन्ही बाजूंनी असलेल्या डोंगर फोडण्याच्या बहुप्रतिक्षित कामाला अखेर सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी अरुंद व धोकादायक रस्त्यामुळे वारंवार अपघात होत होते.
 
विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे, घसरण तसेच वाहतुकीची कोंडी ही येथील नित्याची समस्या बनली होती. नातेखिंड हा किल्ले रायगडकडे जाणार्‍या पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून देश-विदेशातून येणारे पर्यटक, शिवप्रेमी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात. मात्र डोंगरकडेला असलेल्या अरुंद रस्त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.
 
त्यामुळे या ठिकाणी डोंगर फोडून रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर नॅशनल हायवे विभागामार्फत डोंगर फोडण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. या कामामुळे रस्त्याची रुंदी वाढणार असून भविष्यात वाहतुकीसाठी अधिक सुरक्षित व सोयीस्कर मार्ग उपलब्ध होणार आहे. किल्ले रायगडकडे जाणारा संपूर्ण रस्ता हळूहळू पूर्णत्वाकडे जात असून नातेखिंड व वालसुरे येथील पुलांची कामे शिल्लक होती.
 
त्यापैकी नातेखिंड येथील डोंगर फोडण्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या रुंदीकरणामुळे भविष्यात अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक, वाहनचालक व पर्यटकांनी व्यक्त केली आहे. तसेच काम करताना योग्य सुरक्षितता उपाययोजना, वाहतूक नियोजन आणि पर्यावरणीय बाबींची काळजी घ्यावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे. हे काम लवकर पूर्ण होऊन रायगडकडे जाणारा प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर व्हावा, अशी सर्वांची अपेक्षा आहे.