कर्जत । बकरी फार्मला आग , 400 बकर्‍या, 350 कबुतरांचा होरपळून मृत्य

29 Jan 2026 19:17:08
 karjat
 
कर्जत । तालुक्यातील कर्जतनेरळ राज्यमार्गावर माणगाव गावच्या हद्दीत असलेल्या राबीया बकरी फार्ममध्ये सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत सुमारे 400 बकर्‍या तसेच 350 कबुतरे होरपळून मृत्युमुखी पडली, तर फार्म मालकाचे अंदाजे दीड कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
 
मंगळवारी रात्री सुमारे 1.30 ते 2.00 वाजण्याच्या सुमारास फार्म परिसरातून अचानक धुराचे लोट व आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. काही मिनिटांतच आग बकरी पालनासाठी उभारलेल्या शेड्समध्ये पसरली. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की बकर्‍यांना बाहेर काढण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने मुक्या प्राण्यांचा दुर्दैवी अंत झाला.
 
फार्म मालकांच्या म्हणण्यानुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विद्युत वाहिन्यांमधील बिघाडामुळे ठिणग्या पडून आग भडकली असावी. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीस धाव घेतली; मात्र तोपर्यंत फार्मचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. मात्र बकरी पालनावर अवलंबून असलेल्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. महसूल व पशुसंवर्धन विभागाकडून पंचनामा सुरू असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0