खोपोली/पाली/बेणसे । राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी (28 जानेवारी) सकाळी विमान अपघातात निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाली बाजारपेठेसह सुधागड तालुक्यात ककडीत बंद पाळण्यात आला. खालापूर तालुक्यात, खोपोली शहरातही शोककळा पसरली असून बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.
जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच सर्वपक्षियांनी प्रचार दौरे रद्द करुन दुखवटा पाळला. बुधवारी सायंकाळी 5 वाजता पाली गांधी चौकामध्ये सुधागड व पालीकरांच्यावतीने अजित पवार यांना गांधी चौकामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. दुपारनंतर व्यापार्यांनी पाली शहरात कडकडीत बंद पुकारुन अजितदादांच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहिली. सर्वसमावेशक, विकासदृष्टी असलेला प्रगल्भ राजकीय नेता म्हणून अजित पवार लोकप्रिय होते. सामान्य कार्यकर्त्यापासून सामान्य जनतेपर्यंत त्यांनी आपला संपर्क ठेवला होता. त्यामुळे त्यांच्या समर्थकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
अनेकांना अश्रू अनावर झाले. सकाळपासून सोशल मिडीयावर अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सुधागड तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे यांनी सांगितले की ही बाब मनाला तीव्र वेदना देणारी आहे. अजितदादा यांच्या जाण्याने आमच्यावर प्रचंड मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते आपल्यात नाहीत यावर अद्याप विश्वास बसत नाही. काही दिवसांपूर्वी रायगड नागोठणे येथील एका सोहळ्यात दादांची भेट झाली होती, महाराष्ट्रातील चतुरस्त्र नेता दादांच्या रूपाने आपण गमावला, अशी प्रतिक्रिया संदेश शेवाळे यांनी दिली.
दुसरीकडे, खालापूर तालुक्यात, खोपोली शहरातही शोककळा पसरली असून बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि उध्दव ठाकरे पक्षाने परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढत आहेत तर शिंदे शिवसेना आणि भाजप आरपीआय पक्ष निवडणूक लढत आहेत. अजित पवारांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच सर्व पक्षांनी प्रचार दौरे रद्द करत दुखवटा पाळला. दरम्यान, अजित पवार यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी गुरुवारी, 29 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता धाकटी पंढरी (साजगांव) ताकई येथे परिवर्तन विकास आघाडीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.