मुंब्रात घुसून ट्रान्सफॉर्मर चोरट्यांवर कारवाई , नेरळ पोलिसांचे तुफान ‘ऑपरेशन स्ट्राईक’; टोळी जेरबंद

29 Jan 2026 18:38:59
 karjat
 
नेरळ/कर्जत । नेरळ, कर्जत व खालापूर परिसरात रात्रीच्या अंधारात विद्युत ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारांची चोरी करणार्‍या टोळीवर नेरळ पोलिसांनी थेट मुंब्य्रात जाऊन धडक कारवाई केली. कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील ट्रान्सफॉर्मर चोरी प्रकरणाचा छडा लावत नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी राहुल वरोटे यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे.
 
ही टोळी चालू अवस्थेतील विद्युत वाहक ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा बंद करून गरम तेलातील तांब्याच्या तार काढत होती. त्यामुळे नेरळ, कर्जत व खालापूर परिसरात वारंवार वीजखंडित होऊन नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या प्रकारामुळे तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल झाले होते.14 जानेवारी रोजी पहाटे कोल्हारे ग्रामपंचायत मालकीच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची तार चोरीला गेल्याने प्रकरण गंभीर बनले.
 
गुन्हा दाखल होताच नव्याने कार्यभार स्वीकारलेले पोलीस अधिकारी राहुल वरोटे यांनी रायगड पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार केले. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या पांढर्‍या रंगाच्या वॅगनार कारचा माग काढत नेरळ पोलिसांनी मुंब्य्रात छापा टाकला. एकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीतून त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेत चोख नियोजनाने संपूर्ण टोळी जेरबंद करण्यात आली.
 
अटक करण्यात आलेल्या चोरट्यांमध्ये नसीम नसीर साहा, रोजन लतिफ अली, मोहम्मद हनीफ फारुख, इब्राहिम जान मोहम्मद खान व जका अल्लाह मोहम्मद इब्राहिम खान यांचा समावेश आहे. तपासात या टोळीने परिसरातील ट्रान्सफॉर्मर फोडून चार लाख रुपयांहून अधिक नुकसान केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी चोरी केलेल्या तांब्याच्या तारांसह चोरीसाठी वापरलेली कार असा सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या धडक कारवाईमुळे ट्रान्सफॉर्मर चोरी करणार्‍या टोळ्यांचे धाबे दणाणले असून नेरळ पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0