मुख्यमंत्री इतके हतबल का आहेत ? विकास गोगावले यांच्या अटकेवरुन उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले

महाड येथील शिवसेना, राष्ट्रवादीतील राड्यावरुन न्यायालयाची नाराजी

By Raigad Times    23-Jan-2026
Total Views |
mahad
 
महाड । नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांच्या मुलासह इतर आरोपींना अटक करण्यात सरकारला आलेल्या अपयशावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री आणि भरत गोगावलेंकडून निर्देश घ्या, अशा सूचना कोर्टाने राज्य सरकारला दिल्या आहेत.
 
भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले, पुतण्या महेश गोगावले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीयांश जगताप यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत. महाडप्रकरणी मंत्र्याच्या मुलासह इतर आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. सरकार कोणालाही 24 तासांत अटक करू शकते. पण जेव्हा त्यांना अटक करायची नसते तेव्हा ते अशी प्रतिज्ञापत्रे सादर करतात, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने फटकारले.
 
यावेळी आपला मुलगा फरार नसून आपल्या संपर्कात असल्याचे भरत गोगावलेंचे वक्तव्य मुंबई उच्च न्यायालयासमोर येताच अद्याप गोगावलेंचा जबाब का घेण्यात आला नाही? असा सवाल राज्य सरकारला करण्यात आला. मुलगा बेपत्ता असल्याबद्दल त्यांचा देखील जबाब नोंदवा, हे सांगायलादेखील न्यायालय विसरले नाही. महाड नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान नवेनगर परिसरात तणाव उसळला होता.
 
विकास गोगावले आणि सुशांत जाबरे समर्थक आमनेसामने आले आणि तुफान हाणामारी झाली. प्राथमिक माहितीनुसार, सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला विकास गोगावले यांच्या समर्थकांनी मारहाण केली. जाबरे समर्थकांच्या अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली. ही बाचाबाची सुरु असताना सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याची माहिती आहे.
 
त्यानंतर विकास गोगावले हेच रिव्हॉल्वर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे महाडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही कार्यकर्त्यांवर परस्परविरोधी गुन्हे महाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. मात्र आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर हे सगळे आरोपी फरार आहेत. तेव्हापासून विकास गोगावले यांच्यासह दोन्ही गटातील लोक फरार आहेत.