पनवेल । पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले असून यंदा हे पद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव आहे.
तर नवी मुंबईचे महापौरपद हे सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित आहे. पनवेलमध्ये सलग दुसर्यांदा महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणार्या भारतीय जनता पक्षाकडूनच पुढील महापौर होणार, हे जवळपास निश्चित असले तरी, नेमकी संधी कोणाला मिळणार? यावरुन पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.पनवेल महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने तब्बल 60 जागांवर विजय मिळवला असून, त्यापैकी 56 नगरसेवक भाजपचे आहेत.
मित्रपक्ष शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. विरोधकांकडे केवळ 18 जागा असल्याने महापौरपद भाजपकडेच जाणार, हे स्पष्ट आहे. महापौरपदासाठी यंदा नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण जाहीर झाल्याने भाजपमधील ओबीसी प्रवर्गातील पुरुष व महिला नगरसेवकांची नावे चर्चेत आली आहेत. याआधी अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण महिला अशा आरक्षणांतून डॉ.कविता चौतमोल यांना सलग पाच वर्षे पनवेलचे प्रथम नागरिकत्व मिळाले होते. आता ओबीसी आरक्षणामुळे अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
ममता म्हात्रे आघाडीवर ?
महापौर पदासाठी ममता प्रितम म्हात्रे यांचे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. ठाकूर कुटुंबानंतर भाजपला बळ देणारे नेतृत्व म्हणून म्हात्रे कुटुंबाकडे पाहिले जाते. त्यामुळे पनवेलचे प्रथम नागरिकत्व ममता म्हात्रे यांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
नितीन पाटील यांचाही दावा !
भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील हेही महापौरपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी आहेत. गेल्या काही वर्षांपासून पक्षसंघटनेत सक्रिय असलेले पाटील यांची स्वतंत्र ओळख असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी त्यांची जवळीक आहे. त्यामुळे पक्षनेतृत्वाकडून त्यांच्याही नावाचा गंभीरपणे विचार केला जात असल्याचे बोलले जात आहे. तसेच महापौरपद ममता म्हात्रे यांना दिल्यास नितीन पाटील यांना सभागृह नेते किंवा स्थायी समिती सभापती पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
भाजपशी जवळीक असणारी नावे !
महापौरपदाच्या चर्चेत डॉ.अस्मिता जगदीश घरत यांचे नावही पुढे येत आहे. उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमा आणि ठाकूर कुटुंबाशी दीर्घकाळापासून असलेली जवळीक यामुळे घरत यांच्याकडेही ‘नव्या पनवेलकर महापौर’ म्हणून पाहिले जात आहे. याशिवाय दर्शना भोईर, प्रतिभा भोईर, अमर पाटील, विकास घरत, प्रवीण पाटील, दशरथ म्हात्रे, मनोज भुजबळ, सीताताई पाटील, राजेश्री वावेकर, बबन मुकादम, प्रमिला पाटील यांच्यासह अनेक नावे चर्चेत आहेत.
अंतिम निर्णय ठाकूरांचा !
3 फेब्रुवारी रोजी महापौरपदाची निवडणूक होणार असल्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रक्रियेतील अंतिम निर्णय आमदार प्रशांत ठाकूर यांचाच असणार आहे. त्यामुळे ‘ठाकूर जे ठरवतील, तोच पनवेलचा महापौर’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उपमहापौरपदाचे काय ?
महायुतीत भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहभागी असल्याने उपमहापौर पद मित्र पक्षाला दिले जाणार की भाजपमधीलच एखाद्या नगरसेवकाला संधी मिळणार याबाबतही उत्सुकता आहे. उपमहापौरपदाच्या वाटपावरूनही युतीत कसोटी लागणार आहे.